क्कण आंतरजाल चिक्कण आंतरजाल
असं आंतरजाल सुरेख बाई ब्रॉडबँड लावावं
अस्स ब्रॉडबँड सुरेख बाई जीमेली आणावं
अस्स जीमेल सुरेख बाई अकाउंट काढावं
अस्स अकाउंट सुरेख बाई इमेली लिहाव्या
अश्शी इमेल सुरेख बाई माहेरी धाडावी
अस्स माहेर सुरेख बाई उत्तरं मिळती
अस्स सासर द्वाड बाई सेंडर ब्लॉक करती !!!
~~~~~~
नणंदा भावजया दोघी जणी
ऑनलाइन नव्हतं तिसरं कोणी
अनॉनिमस प्रतिसाद दिला कुणी
मी नाही दिला वहिनीने दिला
माझा दादा ऑनलाइन येईल गं
दादाशी चॅटिंग करेन गं
दादा तुझी बायको डु आयडी
प्रतिसादांत टाकत्ये बघ काडी
तू पण लाग रे तिच्या पाठी
आंतरजालाची महती मोठी !!!
~~~~~
फेसबुकवर प्रोफाइल काढ गं सुने मग जा आपल्या माहेरा
फेसबुकवर प्रोफाइल काढलं हो सासुबाई आता तरी जाऊ द्या माहेरा
प्रोफाइल फोटो लाव गं सुने मग जा आपुल्या माहेरा
प्रोफाइल फोटो लावला हो सासुबाई आता तरी जाऊ द्या माहेरा
स्टेटस अपडेट टाक गं सुने मग जा आपुल्या माहेरा
स्टेटस अपडेट टाकलं हो सासुबाई आता तरी जाऊ द्या माहेरा
अपडेट वर कमेंट्स येऊ दे गं सुने मग जा आपुल्या माहेरा
अपडेट वर कमेंट्स आल्या हो सासुबाई आतातरी जाऊ द्या माहेरा
कमेंट्सना उत्तर दे गं सुने मग जा आपुल्या माहेरा
कमेंट्सना उत्तर दिलं हो सासुबाई आता तरी जाऊ का माहेरा
आणा आयफोन, जोडा वाय-फाय, जाऊ द्या राणीसाहेब माहेरा
आणला आयफोन, जोडला वाय-फाय, गेल्या राणीसाहेब माहेरा !!!
{'सूनबाई माहेरी गेली (एकदाची)' सासुबाईंचं लगबगीने आलेलं ट्वीट}
~~~~~
(हा जरा नो-आंतरजाल पण नो-किडिंग भोंडला )
भाद्रपदाचा महिना आला
पार्वती बोले शंकराला
लावा हो जरा कुकराला
भात मुदीला वरण ओरपायला
का ची को तोंडी लावायला
देव भोळे कामाला लागले
डाळ-तांदूळ कुकरात गेले
काकडी चोचुनी वर कूट पेरले
गणेश बाळाला जेऊ घातले
आंघोळ घालूनी निजवले
पार्वती देवी हॅप्पी हॅप्पी
मिळाली देवांना जादु की झप्पी !!!
~~~~~
आड बाई आडोरी
आडात पडली पाकोळी
लॉग इन केले सक्काळी
आड बाई आडोरी
आडात पडली सुपारी
फेसबुक अपडेट दुपारी
आड बाई आडोरी
आडात पडली शंकरपाळी
आता ट्विटरची पाळी
आड बाई आडोरी
आडात पडली कात्री
ब्लॉग लिहिला रात्री
आड बाई आडोरी
आडात पडला शिंपला
(आदमी तो था भला)
आंतरजालाच्या नादसुपारीवला !!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा