गुरुवार, १४ जानेवारी, २०१६

* दिनविशेष ( दि. १४/०१/२०१६ ) *

* पर्व मकर संक्रांतीचे! 

            (भाग १- भोगी सण) *


* भोगी- नारीशक्तीच्या आदरभावाचा सण! *


* भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा! *



         नमस्कार मित्रमैत्रीणींनो...!


     दिवाळी, नवरात्र या सणांप्रमाणेच मकर संक्रांती या सणाचेही पर्व असते! दिवाळी किमान सहा दिवस, नवरात्र नऊ दिवस तशी मकर संक्रांत ही एकूण तीन दिवसांचे पर्व असते! 


         मकर संक्रांतीच्या पर्वात तीन ही दिवसांचे सण वेगवेगळे साजरे होतात.


१) भोगी ( संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा सण ).

( दि. १४/०१/२०१६ )


२) संक्रांती ( मकर संक्रांती ).

( दि. १५/०१/२०१६ )


३) किंक्रांत ( करिदिन ) 

( दि. १६/०१/२०१६ )


       आज आपण माहिती मिळवू या भोगी या सणाची!


         पौष महिन्यात,  'संक्रांत' या सणाच्या आदल्या दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजेच भोगी सण होय!


          भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा! या दिवशी हा सण साजरा करीत आपण सर्वांनी आनंद उपभोगायचा आहे! कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. 

पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे! जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो, तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात, याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाष्णीला जेवावयास बोलावतात. तसे शक्य नसल्यास त्या पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगी देणे म्हणतात!


          भोगी या सणाच्या दिवशी दिवाळी सणासारखाच उत्साह असतो. या दिवशी सकाळी आपले घर व घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दारासमोर रांगोळ्या काढल्या जातात. घरातील सर्व सदस्य तीळ मिश्रीत पाण्याने अभ्यंगस्नान करून नवनवीन कपडे परिधान करतात. मुली व महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरी गेलेल्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. अशाप्रकारे कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो.

          या भोगी सणाच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पध्दत आहे. ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी, पावटे, गाजर,  हरभरे, वांगी या सर्वांची मिळून केलेली लेकुरवाळी भाजी असा बेत करतात.


        या दिवशी सवाष्णीला जेवायला बोलवतात. तिचे आदरातिथ्य केले जाते देवाची व सूर्याची पूजा करुन वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवून सवाष्णसह सर्वजण एकत्र जेवायला बसतात.


          जेवणानंतर सवाष्णीला दान- दक्षिणा देण्याची ही पध्दत आहे! 


              वर सांगितल्याप्रमाणे जर सवाष्ण जेवायला येणे शक्य नसल्यास त्या पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगी देणे म्हणतात!


       अशा रितीने मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा सण अर्थातच भोगी सण उत्साहात साजरा करतात! 


      थोडक्यात काय तर...


भोगी सण म्हणजे आनंदोत्सव...


नारीशक्ती सत्वाचे पुजन....


नारीशक्तीच्या ममत्वाचे ऋण व्यक्त करण्याचा सण...


नारीशक्तीच्या आदरभावाचा सण...!


        मित्रमैत्रीणींनो...


पोस्टची सांगता चारोळीने करु या!


                  * चारोळी *


* भोगी- नारीशक्तीच्या आदरभावाचा सण! *


भोगी सण आनंद उपभोगाचे तत्व, 


सवाष्ण महिलेचे पुजिले जावे सत्व;


भोगी सण सांगे नारीशक्तीचे ममत्व,


सवाष्णला दिलेल्या दानाचे महत्व!




 

     आपणां सर्वांना पुनश्च भोगी


      सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc