रविवार, २४ एप्रिल, २०१६

*** दैव आणि प्रयत्न ***


आमच्या गल्लीत एक पानवाला आहे. त्याच्याकडे 

पाहिले की असे वाटते तो आपलीच वाट पाहतो.त्याच्या कडे ग्राहक गेला की तो त्याच्याशी गप्पा गोष्टी व चर्चा करत असतो. त्यात त्याला फार आनंद व समाधान वाटत असते. पान बनवताना त्याचा बरा वेळ जायचा. मी फार वैतागायचो.

एक दिवस मी ठरवले याला फार चर्चा करायची हौस आहे का? आज त्याला असा प्रश्न विचारतो की त्याने कायमची चर्चा बंद केली पाहिजे.

मी त्याच्या दुकानावर गेलो व त्याला विचारले, बाबा रे! मला एक प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर देवू शकतोस का? तो म्हणाला, तुम्ही खुशाल विचारा मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.

मी विचारले, " माणूस मेहनत करतो मग त्याला यश मिळाले की तो म्हणतो हे देवाने यश पदरात टाकले. मग मला सांग दैव श्रेष्ठ की मेहनत?

मला वाटले आता याची पुरती बोलती बंद होणार, पण त्याने जे उत्तर दिले ते ऐकून मी अवाक झालो. बोलती बंद त्याची नाही तर माझीच झाली.

तो म्हणाला, " मला सांगा तुमचे बँकेत सेफ डिपॉझिट चे लॉकर आहे? त्या लॉकरला दोन चाव्या असतात एक तुमच्याकडे आणि एक बँक मँनेजर कडे. लॉकर उघडताना त्या दोन्ही चाव्या लॉकरला लावाव्या लागतात तरच तो लॉकर उघडतो. अन्यथा नाही. बरोबर ना? मी म्हणालो बरोबर, पण याचा मी विचारलेल्या प्रश्नाचा काम संबंध?

तो म्हणाला, जसे बँक लॉकरला दोन चाव्या असतात तशाच मानवास नियतीने दोन चाव्या दिलेल्या आहेत. एक मेहनत चावी ती आपल्या पाशी असते तर दुसरी नशीब (दैव) चावी ही त्या परमेश्वरा पाशी असते.

आपण आपली आपण चावी यशाच्या लॉकरला लावून द्यायची, जेव्हा परमेश्वर त्याकडची चावी यशाच्या लॉकरला लावेल तेव्हाच आपले यशाचे लॉकर उघडेल अन्यथा नाही.

यशासाठी मेहनत व नशीब या दोन्ही चाव्या आवश्यक असतात, त्या शिवाय यशाचे द्वार उघडत नाही.

मानवाने मेहनत करता करता त्या परमेश्वराचे सतत नामस्मरण करत राहावे. तरच त्याला यश मिळेल, अन्यथा नाही. नुसती मेहनत करूनही उपयोग व नुसती भक्ती करून उपयोग नाही. यश मिळवण्यासाठी मेहनत व भक्ती दोन्ही आवश्यक असतात.

 ( लेखक माहीत नाही. )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc