सारख्या आजारांमध्ये होणारे विस्मरण.... त्यातून होणारी घुसमट... आणि त्या वयात असणारी अगतिकता...अश्याच एका आज्जीचं मनोगत... Very touchy poem written by Saleel Kulkarni in his Loksatta column today...
सारखं सारखं नका मला विचारू की.. आठवतंय का तुला? आठवतंय का?
..मी खरंच मेंदूच्या सगळ्याच्या सगळ्या नसा ताणून प्रयत्न करतीये पण नाही मला आठवत काही..
मला सारखं समजावून नका सांगू की.. कसा आजार.. कसं शास्त्र.. कसं आयुष्य..
नको.. मला समजावून सांगण्याची नाही.. समजून घ्यायची ही वेळ आहे..
तुमच्या कल्पनेपलीकडे गोंधळ चाललाय माझ्या मनांत..
शाळेतले सर..
एसटीचा प्रवास..
बाबांचा आवाज येतो कानांत..
मधूनच लहानपणीची भोंडल्याची गाणी,
आजीच्या नऊवारी लुगडय़ाचा मऊ मऊ स्पर्श जाणवतो गालाला
..उंच डोंगर, दऱ्या, धबधबे दिसतात..
लहानपणच्या राजू आणि राणीचा आवाज येतो कानांत
‘‘आई.. आई..’’
खूप चेहरे, खूप प्रसंग, खूप आवाज नुसते भराभरा सरकतात डोळ्यांवरून, मेंदूमधून
यांचा चेहरा मात्र ओळखते मी.
म्हणजे असं वाटतं मला..
कारण कधी कधी एक अनोळखी माणूस मला औषधाच्या गोळ्या देतो आणि तो ओळखीचा वाटतो, पण आठवत नाही नक्की..
– मला कळतंय की थोडं जास्तच अवघड आहे माझ्याबरोबर जगणं पण फक्त शांतपणे थांबा तुम्ही माझा हात धरून माझ्याशेजारी..
माझे भरभरून देण्याचे दिवस सरले असावेत. ..पण मी काय करू?
मी प्रयत्न करते प्रत्येक संदर्भ
पुन्हा पुन्हा आठवण्याचा..
कधीकधी तर खोटंसुद्धा बोलते.. नाटक करते मी.. ओळखल्याचं.. आठवल्याचं.. तुम्हाला बरं वाटावं म्हणून.. पण..
मला खरंच नाही आठवत काहीच..
पण
थांबाल ना माझ्यासोबत?
माझा हात धरून?
त्या शेवटच्या प्रवासापर्यंत?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा